Dr. R.C.Bose : Indian Statistician भारतीय संख्याशास्त्रज्ञ : डॉ. राजचंद्र बोस
डॉ. राज चंद्र बोस तथा आर. सी. बोस हे अमेरिकेत काम करणारे भारतीय गणितज्ञ आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ होते. डिझाईन थिअरी, मर्यादित भूमिती आणि एरर-करेक्टिंग कोडच्या सिद्धांतामधील त्यांचे संशोधन कार्य प्रसिद्ध आहे. १७८२ साली लिओनार्द ऑयलर या स्विस गणितज्ञाने काटकोनी लॅटिन चौरसा (ओर्थोगोनल लेटीन स्क्वेअर) विषयी मांडलेले अनुमान रचनात्मक सिद्धतेसह सपशेल खोटे ठरविणाऱ्या त्रिमूर्तीपैकी एक असणारे आर. सी. बोस यांचा १९ जून हा जन्मदिन. त्यानिमित्ताने ....
कोलंबिया व चेपेल हिलच्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातून त्यांना व्याख्याते म्हणून निमंत्रित केल्याने डॉ. बोस १९४७ मध्ये अमेरिकेत गेले. तेथील बऱ्याच संख्याशास्त्रज्ञांशी त्यांचा परिचय झाला, तसेच आणखी काही विद्यापीठातून संख्याशास्त्रावर व्याख्याने देण्यासाठी यांना बोलावले गेले. तेथील मोकळे वातावरण व संशोधनाला पोषक अशी मोकळीक पाहून त्यांना ते आवडले. अमेरिकेतील शैक्षणिक जगात राजकारण नसते, हे विशेष. अमेरिकेतील काम संपल्यावर भारतात परतण्यापूर्वी त्यांना नॉर्थ कॅरोलिना, इलिनोईस, कॅलिफोर्निया आदी विद्यापीठातल्या कायमच्या जागा साठी आमंत्रणे आली तसेच भारतातही आयएसआयचे उपसंचालक पद व प्राध्यापक लेव्ही यांच्या निवृत्तीमुळे रिकामे झालेले कोलकाता विद्यापीठातील हार्डीज अध्यासन व विभाग प्रमुख अशा मानाच्या जागा देणाऱ्या नोकऱ्या चालून आल्या . त्यापासून चांगला आर्थिक लाभ होणार होता. तथापि कोलकात्यातील जागा स्वीकारली तर त्याबरोबर प्रशासन विषयीच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. साहजिकच त्यासाठी वेळ व ऊर्जा लागणार आणि आपल्या आवडीच्या विषयात संशोधन करता येणार नाही. आपला व्यासंग पुरा करता येणार नाही, असा विचार करून १९४९ मध्ये त्यांनी चेपेल हिलच्या नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील संख्याशास्त्र विभागाचे प्रमुखपद स्वीकारले. त्यानंतर तेथे ते बावीस वर्षे अध्यापन व संशोधन कार्य करत राहिले. अनेक प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सात भारतीय विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी संपादन केली, त्यात डॉ. श्रीखंडे हे प्रख्यात संख्याशास्त्रज्ञ ही होते. डॉ. बोस यांनी प्रयोग संकल्पना संबंधी संशोधन चालू ठेवले. त्यांनी बोस- नायर शोध निबंधावर आपल्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने अधिक संशोधन केले. बोस यांना १९५५ मध्ये संकेतन उपपत्ति ( कोडींग थेरी ) मध्ये रस निर्माण झाला. त्यातूनच बोस -चौधरी संकेतना चा शोध लागला. संकेतन हे वाहिनीवरून माहितीचे तार यंत्राने प्रक्षेपण करण्याचे संदेशवाहन क्षेत्रातील साधन आहे. मोर्स कोड हे बिंदू व रेषा या द्वारे संदेश पाठवते. परंतु या संदेश ग्रहणात नोईज मुळे व्यत्यय येतो, तथापि बोस-चौधरी यांच्या संशोधनाने या चुका सुधारल्या जाऊ शकतात. त्यानंतर डॉ. बोस यांनी पृथक व सांत गणितीय संरचना असणाऱ्या चयन (कॉम्बिनेटारिक्स) या शाखेत संशोधन केले. त्यांच्या जीवनातील एक महत्वाची घटना येथे सांगावी लागेल.
१७८२ साली लिओनार्द या स्विस गणितज्ञाला रशियाची राणी कॅथेरीन द ग्रेट हीने तिच्या सैन्यातील ३६ अधिकाऱ्यांना ६ x ६ आकाराच्या जाळीमध्ये, प्रत्येक आडव्या आणि उभ्या जाळीमध्ये असे उभे करायचे की प्रत्येक उभ्या आणि आडव्या ओळीमध्ये सैन्याच्या ६ तुकड्यापैकी एकेक आणि ६ हुद्द्या पैकी एकेक अधिकारी असेल, याबाबत विचारले. राणीला हवी असलेली रचना ६ x ६ आकाराचे दोन काटकोनी लॅटिन चौरस मिळवून करता येते. तथापि, खूप प्रयत्न करूनही ऑयलर ला असे दोन चौरस सापडले नाहीत. याउलट, ऑयलरला माहित होते की ‘न’ ही कोणतीही एकपेक्षा मोठी नैसर्गिक संख्या असल्यास व तिला चार ने भागल्यास बाकी जर ०,१ किंवा ३ उरत असेल तर न x न आकाराचे दोन काटकोनी लॅटिन चौरस जरूर मिळतात. २ x २ आकाराचे दोन काटकोनी लॅटिन चौरस नसतात हे तर उघडच होते आणि ६ x ६ आकाराचे दोन काटकोनी लॅटिन चौरस तर मिळत नव्हते. यावरून त्याने असा अंदाज बांधला की,’जर न या नैसर्गिक संख्येला ४ ने भागल्यावर बाकी दोन ( म्हणजेच न ही संख्या २,६,१०,१४,.... असली तर ) उरली तर न x न आकाराचे दोन काटकोनी लॅटिन चौरस मिळणारच नाहीत. या विधानाला ऑयलर चे अनुमान (ऑयलर्स कन्जेक्चर) असे म्हणतात. त्यानंतर १२८ वर्षांनी म्हणजेच १९१० साली गास्तो तारी या फ्रेंच गणितज्ञाने ऑयलर चे अनुमान न = ६ या संख्येसाठी बरोबर असल्याचे दाखवून दिले. त्याकाळी संगणक नसताना ६ x ६ आकाराचे सर्व म्हणजे ८१,२८,५१,२०० लॅटिन चौरस तपासण्याचे जिकीरीचे काम तारीने पार पाडले.( दोन न x न आकाराचे लॅटिन चौरस खऱ्या अर्थाने वेगळे असणे याला ते एकमेकांशी काटकोनी किंवा लंबकोनी(ऑर्थोगॉनल) आहेत, असे म्हणतात. विस्तार भयास्तव अधिक गणिती तपशील देता येणे शक्य नाही). त्यातील कोणतेही दोन एकमेकांशी काटकोनी नाहीत, हे त्याने पडताळून पाहिले. तरीही,१०,१४,१८,२२,....या संख्यांसाठी ऑयलर चे अनुमान सत्य की असत्य हा प्रश्न तसाच राहिला. याच प्रश्नावर डॉ. आर. सी. बोस, डॉ. एस.एस. श्रीखंडे आणि रेमिंगटन रेंड कंपनीच्या युनिव्हेक विभागातील इ.टी. पार्कर काम करू लागले. सुरुवातीला इतरांप्रमाणे त्यांनाही ऑयलर चे अनुमान खरे आहे , असेच वाटत होते. तथापि आतापर्यंत न वापरलेल्या काही वेगळ्या पद्धतीने विचार करून १९५९ च्या एप्रिल मध्ये या तिघांनी अमेरिकन मॅथेमॅटीकल सोसायटी च्या सभेमध्ये ऑयलर चे अनुमान न = २ आणि न = ६ या संख्या सोडून बाकी सर्व (ज्यांना चारने भागल्यावर बाकी दोन उरते अशा) संख्यांसाठी असत्य असल्याचे रचनात्मक सिद्धतेसह जाहीर केले. ऑयलर ला सपशेल खोटे ठरवणे ही काही लहानसहान गोष्ट नव्हती. रविवार, २६ एप्रिल १९५९ च्या न्युयॉर्क टाइम्स च्या पहिल्या पानावर बोस, श्रीखंडे आणि पार्कर यांचा फोटो झळकला आणि गणित क्षेत्रात खळबळ माजली. ( कारण न्यू यॉर्क टाइम्सचे पहिले पान लाखो डॉलर्स देऊनही विकत घेता येत नाही).
प्रा. विजय कोष्टी, सहयोगी प्राध्यापक, संख्याशास्त्र विभाग
पी.व्ही.पी. कॉलेज कवठे महांकाळ (सांगली), ९४२३८२९११७
Comments
Post a Comment