1 April: April Fool जागतिक मूर्ख दिवस
१ एप्रिल (1 April) हा दिवस जागतिक मूर्ख दिवस किंवा जागतिक बकरा दिवस अर्थात ‘एप्रिल फूल’ (April Fool) म्हणून अनेक देशात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जण दुसऱ्याला मूर्ख बनवत असतो, तर मूर्ख बनलेल्याला ही इतर दिवसांप्रमाणे या दिवशी मूर्ख बनविणाऱ्याचा राग येत नाही, हे या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. तथापि, यावर्षी पुनः एकदा वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोणीही यादिवशी एप्रिल फूल च्या नावाखाली खोट्या अफवा, संदेश पसरवू नयेत. किंबहुना, सद्यस्थितीत समाजमाध्यमांचा अत्यावश्यक कामांसाठीच वापर करावा असे वाटते. या दिवसाची सुरुवात केव्हा, कोठे आणि कशी झाली ? विविध देशांमध्ये हा दिवस कसा साजरा केला जातो, त्यामागे कोणत्या अख्यायिका आहेत आणि भारताच्या दृष्टीने याचे महत्व काय आहे आदी बाबींचा यानिमित्ताने थोडक्यात घेतलेला आढावा..... ©
जागतिक मूर्ख दिन !
१ एप्रिल (April Fool) हा दिवस मित्रांना मूर्ख बनविण्याचा, वेड्यात काढण्याचा, फसविण्याचा म्हणजेच एप्रिल फूल करण्याचा दिवस समजला जातो. या दिवशी अनेक जण आपल्या मित्र-मैत्रीणीना काहीतरी खोटे सांगून फसविण्याचा प्रयत्न करीत असतात. याचे नियोजन खूप आधीपासून चाललेले असते. विशेष म्हणजे फसगत झालेला इतर दिवसाप्रमाणे या दिवशी न रागावता हसण्यावारी नेऊन त्यांच्या आनंदात तो ही सहभागी होतो. एकंदर या दिवशी ‘बुरा न मानो, होली है’ असेच सगळीकडे वातावरण पहावयास मिळते. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी हा दिवस साजरा केला जातो. न्यूझीलंड,ब्रिटन,ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये दुपार पर्यंतच एप्रिल फुल करण्याची पारंपरिक पद्धती आहे. दुपारनंतर असे करणाऱ्यास एप्रिल फुल समजले जाते. ब्रिटन मधील वृत्तपत्रामध्ये एप्रिल फुल निमित्त एक मुख्य पान काढले जाते. तथापि, ते केवळ सकाळच्या आवृत्तीसाठीच असते.
याशिवाय फ्रान्स,आयर्लंड, इटली, दक्षिण कोरिया, जपान, रशिया, नेदरलैंड, जर्मनी, ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेमध्ये एप्रिल फूल चा माहौल पूर्ण दिवसभर असतो.
एप्रिल फूल ची सुरुवात केव्हा व कशी झाली ?
एप्रिल फूल दिवसाची सुरुवात कशी झाली याविषयी निश्चित्त अशी एक कथा किंवा आख्यायिका नसली तरी सर्वाधिक मान्यता ब्रिटीश लेखक चॉसर यांच्या ‘द कैंटरबरी टेल्स’ या पुस्तकातील ‘नन्स प्रीस्टस टेल’ या कथेवर आधारलेली आहे. १३ व्या शतकामध्ये इंग्लंडचा राजा रिचर्ड द्वितीय आणि बोहेमिया ची राणी एनी यांच्या लग्नाचा वाड:निश्चयाची तारीख ३२ मार्च जाहीर केली जाते आणि कैंटरबरी तील लोक ती खरी मानतात. मात्र ३२ मार्च ही तारीख अस्तित्वात नसल्याने मूर्ख बनविले जातात. तेव्हापासून १ एप्रिल हा दिवस मूर्ख दिवस समजला जातो. दुसऱ्या एका कथेनुसार प्राचीन युरोपमध्ये नवीन वर्ष १ एप्रिलला साजरे करण्याचा प्रघात होता. तथापि, १५६४ मध्ये राजा चार्ल्स (नववा) ने नवीन कॅलेंडर अस्तित्वात आणले आणि नवीन वर्ष १ जानेवारीला साजरे करण्याचे निर्देश दिले. मात्र बहुतांश लोकांनी १ एप्रिल लाच नवीन वर्ष मानले, तेव्हा अशा लोकांना मूर्ख समझून त्यांची मस्करी करण्यात आली. आणखी एका कथेनुसार १९१५ मध्ये जर्मनीच्या लिले विमानतळावर एका ब्रिटिश पायलटने खूप मोठा बॉम्ब फेकला. हे पाहून तेथे उपस्थित सर्व लोक इकडून-तिकडे पळू लागले आणि बराच वेळ लपून बसले. मात्र, बराच वेळ झाला तरी कोणताही धमाका न झाल्याने लोकांनी परत येऊन त्या जागी पाहिले तर तो बॉम्ब नसून एक मोठा फुटबॉल असल्याचे आणि ज्यावर ‘एप्रिल फूल’ लिहिल्याचे स्पष्ट झाले. एप्रिल फूल च्या संदर्भात १ एप्रिल १८६० हा दिवस तर इतिहासात विशेष प्रसिद्ध आहे. या दिवशी हजारो लोकांना टपालाद्वारे लंडन येथील ‘टॉवर ऑफ लंडन’ येथे सायंकाळी पांढऱ्या गाढवांच्या स्नानाचा कार्यक्रम होणार असून सर्वांनी त्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. विशेष म्हणजे त्याकाळी सामान्य जनतेला टॉवर ऑफ लंडन मध्ये प्रवेश वर्ज्य होता. संध्याकाळ होताच टॉवरजवळ हजारोंच्या संख्येने लोक जमू लागले आणि आत प्रवेश करण्यासाठी धक्का-बुक्की करू लागले. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्याला मूर्ख बनविले गेले आहे, तेव्हा ते वैतागून घरी गेले.
भारतीय कॅलेंडर ची कथा
पूर्वी संपूर्ण जगामध्ये भारतीय कॅलेंडर मानले जायचे ज्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून म्हणजेच एप्रिल पासून होते. तथापि, १५८२ मध्ये पोप ग्रेगरी ने नविन कॅलेंडर लागू केले ज्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात एप्रिल ऐवजी जानेवारीपासून होऊ लागली. बऱ्याचशा लोकांनी हे नवीन कॅलेंडर मान्य केले. तथापि, काही लोकांनी नवीन कॅलेंडर मानले नाही आणि ते एप्रिलमध्येच नवीन वर्ष साजरे करू लागले. या लोकांना मूर्ख समजले जाऊन येथूनच १ एप्रिल हा दिवस मुर्खांचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. तेव्हा, एप्रिल फूल ही पाश्चिमात्य देशांची संकल्पना असली तरी आज भारतासहित जगातील अनेक देशांमध्ये हा दिवस मोठ्या धडाक्यात साजरा केला जातो. यानिमित्ताने, ही गंमत करताना अनेकांना मोठे नुकसानसुद्धा होऊ शकते, हे लक्षात घेऊन एप्रिल फुल साजरा करताना अशा काही गोष्टी कुणीही करू नयेत की ज्यामुळे समोरच्याचे नुकसान होईल किंवा त्या व्यक्तीला इजा होईल.
Comments
Post a Comment