संख्याशास्त्रामधील बहुचलीय विश्लेषण (Multivariate Analysis ) आणि संभाव्यता वितरणे (Probability distributions) या क्षेत्रात संशोधन करणारे भारतीय संख्याशास्त्रज्ञ डॉ. के.सी. श्रीधरन पिल्लाई (Dr. K.C. Sridharan Pillai)
डॉ. के.सी. श्रीधरन पिल्लाई हे अमेरिकेत कार्य करणारे भारतीय संख्याशास्त्रज्ञ होते. संख्याशास्त्रामधील बहुचलीय विश्लेषण (मल्टीव्हेरियेट अनालिसिस ) आणि संभाव्यता वितरणे (प्रोबाबिलीटी डिस्ट्रीब्युशनस) या क्षेत्रातील त्यांचे संशोधन सुप्रसिद्ध आहे. ५ जून हा त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्तने त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा हा प्रयत्न. ©
भारतीय संख्याशास्त्रज्ञ : डॉ. के.सी. श्रीधरन पिल्लाई !©
अमेरिकेत संख्याशास्त्राचे अध्यापन तसेच संशोधन कार्य करणारे भारतीय संख्याशास्त्रज्ञ डॉ. के.सी. श्रीधरन पिल्लाई यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९२० रोजी केरळमध्ये झाला. त्यांनी बहुचलीय संख्याशास्त्रीय विश्लेषण (मल्टीव्हेरियेट स्टॅटिस्टिकल अनालिसिस) यावर विशेष संशोधन करून १९४५ मध्ये पदव्युत्तर पदवी मिळविली. त्यानंतर त्यांची केरळ विद्यापीठात व्याख्याता म्हणून नियुक्ती झाली आणि तेथे ते १९५१ पर्यंत अमेरिकेला जाईपर्यंत सहा वर्षे अध्यापन कार्य करत राहिले. १९५१ साली ते प्रिन्स्टन विद्यापीठात संशोधन अभ्यासासाठी गेले. तेथे एक वर्ष अभ्यास केल्यानंतर ते नॉर्थ कॅरोलीना विद्यापीठात गेले आणि तेथे त्यांनी संख्याशास्त्राची पीएच.डी. ही संशोधन पदवी मिळवली. त्यानंतर त्यांची ‘संख्याशास्त्रज्ञ’ म्हणून पहिली नियुक्ती संयुक्त राष्ट्रांमध्ये (युनायटेड नेशन्स) झाली. तेथे १९५४ ते १९६२ पर्यंत ते कार्यरत राहिले. या दरम्यान त्यांचे महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे फिलिपाईन्स मध्ये विद्यापीठीय संख्याशास्त्रीय केंद्र स्थापन केले. तेथे ते अनेक वर्षे विद्यापीठाचे अभ्यागत प्राध्यापक (व्हीझीटींग प्रोफेसर) आणि सल्लागार (एडव्हायझर) होते आणि तेथील पदवीधर विद्यार्थ्यांच्या संशोधन आणि अभ्यासावरवर देखरेख करत होते.
त्यानंतर १९६२ मध्ये मध्ये डॉ.पिल्लाई यांची पर्ड्यू विद्यापीठात सांख्यिकी आणि गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. येथे त्यांनी तेवीस वर्षे सेवा केली आणि या काळात १५ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यापीठ व इतर ठिकाणी निरनिराळ्या प्रकल्पावर सल्लागार (कन्सल्टंट) म्हणूनही जबाबदारी पार पडली. विद्यार्थ्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांचे काही विद्यार्थी तर जगातील दुर्गम भागातील होते, तरीसुद्धा त्यांचा पत्रव्यवहार त्यांच्याशी चालू असे.
त्यांचे संशोधन मुख्यत: ‘बहुविध संख्याशास्त्रीय विश्लेषण’ यासंबंधी होते. त्यांनी कित्येक ‘बहुविध कार्यपद्धती साठी संख्याशास्त्रीय संभाव्यता वितरणे (स्टॅटिस्टिकल प्रोबाबिलीटी डिस्ट्रीब्युशनस) शोधली. या क्षेत्रातील त्यांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे मोठ्या प्रमाणात वापरल्या जात असलेली ‘बहुविध विश्लेषणात्मक विचरणाची कसोटी’ ( मल्टीव्हेरियट अनालिसिस ऑफ व्हेरियन्स टेस्ट). ही कसोटी त्यांच्या नावाने ओळखली जाते. अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन चे फेलो त्याच प्रमाणे इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स चे फेलो म्हणून त्यांची निवड झाली. ते इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे सभासद होते. पर्ड्यू विद्यापीठातील पदवीधर कार्यक्रम(प्रोग्राम) त्यांनी विकसित केले. सांख्यिकीसारख्या आकडेमोडीच्या विषयाचे अभ्यासक असूनही त्यांना गोल्फ सारख्या खेळामध्ये विशेष रुची आणि गति होती. ते गोल्फ चांगले खेळत असत. त्यांनी ५ जून १९८५ रोजी फायेट, इंडियाना, यूएसए येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांना विनम्र आदरांजली. (संकलित). © प्रा. विजय कोष्टी, कवठे महांकाळ (जि.सांगली).
This comment has been removed by the author.
ReplyDelete